नांदुरा येथे एकाला मारहाण; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : युवकाला फावड्याने मारहाण केल्याची घटना दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील वार्ड क्रमांक एकमधील पोलिस वसाहतीसमोर घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कांता प्रल्हाद श्रीनाथ (४८) (रा. जिगाव ह. मु. पोलिस वसाहत जवळ, नांदुरा) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या घरी काम करीत असताना त्यांच्या पतीला एकाने फावड्याने मारल्याची माहिती मुलांनी दिली. त्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव
घेतली. तेथे विशाल गजानन धुळे हा घाईने निघून गेल्याचे त्यांना दिसले. मारहाणीसंदर्भात पतीला विचारणा केली असता त्यांनी विशाल धुळे यांनी विनाकारण फावड्याने मारहाण करण्यासोबतच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी विशाल गजानन धुळे (रा. नांदुरा) याच्याविरुद्ध कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२) (३), ३५२ भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला.